27/07/2025

पन्हाळा तालुक्यात सरपंच पद आरक्षण जाहीर

पन्हाळा तालुक्यात सरपंच आरक्षण जाहीर

— “कही खुशी, कही गम” ची स्थिती

कळे / प्रतिनिधी

पन्हाळा तालुक्यात सरपंच आरक्षण सोडतीनंतर “कही खुशी, कही गम” अशीच अवस्था निर्माण झाली आहे. काही गावांमध्ये सरपंचपद महिलांसाठी राखीव झाले म्हणून आनंदाचे वातावरण आहे, तर काही ठिकाणी सत्ताधारी गटाचे आरक्षण बदलल्यामुळे नाराजीचे सूर उमटत आहेत. पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत नुकतीच पार पडली. या आरक्षणामुळे अनेक गावे आनंदी झाली असली, तरी काही ठिकाणी सत्ताकारणात उलथापालथ झाल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

सोडतीनंतर अनेक ग्रामपंचायतीत महिला आरक्षण निघाल्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे काही गावांमध्ये अपेक्षित आरक्षण न मिळाल्यामुळे सत्ताधारी गटांची गणिते विस्कटली आहेत. येत्या निवडणुकीत या आरक्षणाचा प्रभाव गावपातळीवर मोठ्या प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी नवे चेहरे उदयाला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सावर्डे तर्फ असंडोलीत पुन्हा सर्वसाधारण महिला आरक्षण

अनुसूचित जातीच्या मतदारांमध्ये नाराजीचा सूर

सावर्डे तर्फ असंडोली (ता. पन्हाळा) : ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची नुकतीच झालेली सोडत गावात चर्चा आणि नाराजीचं कारण ठरत आहे. सन २०१७-१८ ते २०२१-२२ दरम्यान सरपंच पद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित होते. स्थानिक जाणकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना यंदा सरपंच पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाही पुन्हा एकदा सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने अनुसूचित जाती प्रवर्गात संतापाची भावना निर्माण झाली आहे.

गावातील अनुसूचित जातीचे मतदार व सामाजिक कार्यकर्ते यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अनेक वर्षांपासून त्यांच्या गटाला राजकीय नेतृत्वाची संधी मिळालेली नाही, ही बाब त्यांच्या असंतोषाला कारणीभूत ठरत आहे.

स्थानिक पातळीवर आरक्षण प्रणालीबाबत पारदर्शकता असावी, तसेच सामाजिक समावेशाला चालना देणाऱ्या निर्णयांची गरज असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply