राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधा, युवा निष्ठावंत तुमच्यासोबतच !
राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधा, युवा निष्ठावंत तुमच्यासोबतच !
– पी एन पाटील गटाच्या युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत ग्रीन सिग्नल
– राहुल पाटील, राजेश पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय सर्वमान्य
कोल्हापूर/ प्रतिनिधी
एका व्हाट्सअप मेसेजवर युवा कार्यकर्त्यांना धाडलेल्या निरोपावर फुलेवाडी येथील दत्त मंगल कार्यालयामध्ये आयोजित बैठकीस पी एन पाटील गटाचे शेकडो युवा कार्यकर्ते एकत्र जमले. युवकांच्या या बैठकीत राहुल पाटील आणि राजेश पाटील ठरवतील तेच धोरण आणि ते तोरण असा निर्धार करत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या निर्णयाला सर्वांनी हिरवा कंदील दर्शविला.
पी एन पाटील गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) लवकरच प्रवेश करणार आहेत. याबाबत युवा कार्यकर्त्यांची मते आजमावून घेण्यासाठी सोमवारी फुलेवाडी येथे मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत होकार दर्शवात हातावर घड्याळ बांधण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी श्रीपतरावदादा बोंद्रे बँकेचे चेअरमन राजेश पाटील, भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे , शंकरराव पाटील, चेतन पाटील, खराडे सर, सागर राणे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
अजूनही करिष्मा कायम
व्हाट्सअप मेसेज वरून यंत्रणा हलवणे आणि कार्यकर्ते जमवणे हा दिवंगत आमदार पी एन पाटील यांचा करिष्मा अजूनही कायम असल्याचे सिद्ध झाले
