27/07/2025

जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कारवायांना गती

जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कारवायांना गती

नागरिकांनी संशयास्पद घटना आढळल्यास 100 डायल करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर/ प्रतिनिधी

जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला व्यापक गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती (NCORD) बैठक शाहूजी सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार, राज्य उत्पादन शुल्क, महिला व बाल विकास विभाग, अन्न व औषध प्रशासन, औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा माहिती अधिकारी, शिक्षणाधिकारी या विभागांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त करत प्रभावी कारवायांसाठी स्पष्ट निर्देश दिले. अंमली पदार्थांचे सेवन, पुरवठा व विक्री याबाबत ज्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात वारंवार कारवाया होतात, त्या भागांमध्ये तपासण्या वाढवाव्यात. डार्क स्पॉट म्हणून ओळखले जाणारे मोकळ्या जागा, शाळा-महाविद्यालयांचा परिसर, तसेच झोपडपट्ट्यांमध्ये विशेष तपासणी मोहिम राबवावी. सार्वजनिक व खाजगी मोकळ्या जागांवर रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था करण्यासह पेट्रोलींग वाढवण्याचे आदेशही देण्यात आले. पोलीस ठाणे व महाविद्यालयांनी एकत्र येऊन अंमली पदार्थ विरोधी समिती स्थापन करावी आणि या समितीमार्फत नियमित आढावा घेण्यात यावा. नशामुक्त शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे घोषित करून त्यादृष्टीने कार्यवाही करावी. शाळांमध्ये पालकांचा सक्रिय सहभाग घेऊन संस्कार शिबिरांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी यांनी ‘आपदा मित्र’ संकल्पनेच्या धर्तीवर ‘नशामुक्ती मित्र’ ही संकल्पना राबवण्याचा प्रस्ताव मांडला. या मित्रांची ओळख गोपनीय ठेवून, त्यांनी दिलेल्या माहितीवरून कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी जर अंमली पदार्थ सेवन वा विक्री संदर्भात काही घटना निदर्शनास आल्या, तर त्यांनी तात्काळ 100 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. तक्रार देण्याऱ्या व्यक्तिची ओळख यावेळी गोपनीय ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कंट्रोल रूममध्ये 100 क्रमांकावर आलेल्या प्रत्येक तक्रारीवर जबाबदारीने कार्यवाही करावी आणि नागरिकांचा विश्वास संपादन करावा, असे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून कारवायांची माहिती प्रसारित करून विशेष जनजागृती मोहीम राबवावी. महापालिका, ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागाने या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा. नशामुक्त गाव, वॉर्ड, शहर अशा स्पर्धांचे आयोजन करून जागरुकता वाढवावी. यासाठी आवश्यक निधी जिल्हा वार्षिक योजनेतून मागवावा, असे सूचित करण्यात आले.

कृषी विभागाने गावस्तरावर गांजाची लागवड होत नाही याची खातरजमा करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. जिल्हाधिकारी म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अवैध कृत्य घडून त्या ठिकाणाची बदनामी होऊ नये. जर कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या सर्व उपाययोजनांमधून जिल्ह्यातील अमली पदार्थांचे ‘डार्क स्पॉट्स’ कमी करून ते पूर्णतः निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश देत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील अमली पदार्थ विरोधी कारवायांना गती देण्यावर अधिक भर दिला.

Leave a Reply