चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा
— शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे आवाहन
कळे/ प्रतिनिधी
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी २४ वर्षानंतर दुसरा लाभ असलेल्या आश्वासित प्रगती योजनेमध्ये वेतन श्रेणीतील दुरुस्ती ए -४ ऐवजी ए-५ करण्यासाठी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती बंदी विरुद्ध आवाज उठविण्यासाठी सोमवारी ( १८ रोजी ) शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथे दुपारी १.०० वाजता एक दिवसाचे धरणे आंदोलन आयोजित केले आहे. या धरणे आंदोलनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केले. ते आनंदीबाई सरनोबत हायस्कूल आसुर्ले-पोर्ले येथे आयोजित पन्हाळा तालुका शिक्षेतर कर्मचारी मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी पन्हाळा तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नेते बाबासाहेब शेलार होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ व इतर सर्व संघटनांनी हा लढा तीव्र करून शासनाला चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय दूर करण्यास भाग पाडण्याचे आवाहनही यावेळी बाबासाहेब पाटील यांनी केले.
यावेळी शिक्षकेतर महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष श्रीधर गोंधळी, राक्षी हायस्कूलचे मुख्याध्यापक संपतराव चव्हाण – पाटील, अशोक पाटील ( वाघवे ) यांनीही धरणे आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
स्वागत व प्रास्ताविक महेश कुराडे यांनी केले, सदाशिव चौगुले यांनी आभार मानले.
मेळाव्यास पन्हाळा तालुक्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व लिपिक वर्गीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

