शनिवारी शेंडा पार्क जनरल हॉस्पिटलचा स्लॅब शुभारंभ
शनिवारी शेंडा पार्क जनरल हॉस्पिटलचा स्लॅब शुभारंभ व सीपीआरमध्ये विविध सेवासुविधांचे लोकार्पण – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कार्यक्रम…
कोल्हापूर/ प्रतिनिधी :
कोल्हापूर येथील शेंडा पार्कमध्ये राजर्षी छत्रपती शाह महाराज वैद्यकीय नगरीत अद्ययावत सर्व सेवा- सुविधायुक्त आरोग्य संकुल साकारत आहे. शनिवार (दि. ५) रोजी दुपारी ३.३० वाजता पहिल्या मजल्याच्या स्लँबचा शुभारंभ होत आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे. सायंकाळी चार वाजता छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सीपीआर रुग्णालयातील अत्याधुनिक सेवा सुविधांचा लोकार्पण सोहळाही संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला सार्वजनिक व तंञशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार अरुण लाड, आमदार जयंत आसगावकर, आमदार डॉ. विनय कोरे,आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर,आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक,आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राहुल आवाडे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
ऑक्टोबर २०२४ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्ह्यातील या महत्वकांक्षी आरोग्य संकुलाचा पायाभरणी झाली होती. यामध्ये ६०० बेड़स – जनरल हॉस्पिटल, २५० बेड़सचे – कॅन्सर हॉस्पिटल व २५० बेडसचे – सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, असे एकूण ११०० बेड़सच्या हॉस्पिटलचे भूमिपूजन झाले होते. दरम्यान, सीपीआर मध्ये ३० बेड्सचे अत्याधुनिक माँडयुलर अपघात विभाग, १५ बेड्सचे डायलिसिस विभाग, दुधगंगा इमारतीत तळमजल्यात १५ बेड्सचे अतिदक्षता विभाग, क्ष किरण विभागासह विविध अत्याधुनिक सेवा सुविधांसह कंपन्यांच्या सीएसआर फंडातून मिळालेल्या अत्याधुनिक फिरत्या दवाखान्याचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.