27/07/2025

घरपण येथील तरुणांनी गगनबावडा महामार्गावरील स्वतः बुजवले खड्डे

 

घरपण येथील तरुणांनी गगनबावडा महामार्गावरील स्वतः बुजवले खड्डे

संघर्ष स्पोर्ट्स क्लबच्या तरुणांकडून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्तुत्य उपक्रम

कळे/ प्रतिनिधी

कोल्हापूर – गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील घरपण ( ता. पन्हाळा ) गावाच्या हद्दीत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या समस्येला कंटाळून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील संघर्ष स्पोर्ट्स क्लबच्या तरुणांनी पुढाकार घेत स्वतः रस्त्यावरील खड्डे बुजवले.

या उपक्रमात अभिजीत घरपणकर, गणेश कांबळे, चैतन्य कांबळे, संघर्ष कांबळे, प्रज्ञान सावंत आदी तरुणांनी सहभाग घेतला. रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्यामुळे या तरुणांनी एक छोटं पण महत्त्वाचं पाऊल उचलत खडी, मुरूम , माती आणि हातमजुरीच्या साहाय्याने खड्डे बुजवले.

या तरुणांचा उपक्रम गावकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला असून, त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.राष्ट्रीय महामार्गावरील या मुख्य रस्त्यावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अपघाताची शक्यता वाढली होती. कोल्हापूर – गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील रुंदीकरण आणि कॉंक्रिटीकरण आसगाव ( ता. पन्हाळा ) गावापर्यंत सुरु आहे. उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील पुढील रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून होत आहे.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्डे बुजविण्याचे काम

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील थोडे खड्डे बुजविण्याचे काम संघर्ष स्पोर्ट्स क्लब च्या माध्यमातून आम्ही केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील कोल्हापूर – गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाचे उर्वरित काम लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करावे.

अभिजीत घरपणकर,
संघर्ष स्पोर्ट्स क्लब कार्यकर्ता – घरपण ता. पन्हाळा 

Leave a Reply