27/07/2025

ए. आय. च्या वापराने ऊस उत्पादन वाढीसाठी केडीसीसी बँकेचे कर्जवाढीचे धोरण

  1. ए. आय. च्या वापराने ऊस उत्पादन वाढीसाठी केडीसीसी बँकेचे कर्जवाढीचे धोरण

– कार्यकारी समिती सभेत निर्णय

– हेक्‍टरी साडेदहा हजार रुपये कर्जवाढ जादा देण्याचा निर्णय

– ए. आय. च्या वापरामुळे ऊस उत्पादनवाढीचा तज्ञांचा निष्कर्ष

कोल्हापूर : प्रतिनिधी

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच ए. आय. चा वापर वाढतच आहे. दरम्यान; कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने ऊस उत्पादन वाढीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जवाढीचे धोरण मंजूर केले आहे. या धोरणाअंतर्गत शेतकऱ्याला मूळ पिककर्ज मर्यादेपेक्षा हेक्‍टरी साडेदहा हजार रुपये कर्जवाढ जादा देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या शिफारशीनुसार बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाला. सन २०२५-२६ या कृषी वर्षामध्ये प्रायोगिक तत्वराव हे धोरण राबविण्याचे बँकेने ठरविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कृषी क्षेत्रामध्ये ए. आय. तंत्रज्ञानाच्या वापरासाठी बँकेने दोन कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याआधीच जाहीर केली होती.

याआधी ऊस लागवडीसाठी बँकेकडून प्रतिहेक्टरी मंजूर कर्जमर्यादा अशी. आडसाली ऊस लागवडीसाठी- पावणेदोन लाख रुपये. पूर्व हंगामी लागवडीसाठी- दीड लाख रुपये. सुरू लागवडीसाठी- दीड लाख रुपये व खोडवा पिकासाठी- सव्वा लाख रुपये असा कर्ज पुरवठा होत होता. यापुढे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञान वापरासाठी या प्रचलित कर्ज मर्यादेवर हेक्टरी साडेदहा हजार रुपये कर्ज जास्त मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सूक्ष्म सिंचन म्हणजेच ड्रिप इरिगेशन सुविधा आहे आणि यासाठी आवश्यक असणारी भांडवली गुंतवणूक साखर कारखाना किंवा अन्य संस्थेमार्फत असणे आवश्यक आहे.

४० टक्के उत्पादन वाढ 

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए. आय. च्या कृषी क्षेत्रातील वापरामुळे ऊस पिक उत्पादन वाढते, असा तज्ज्ञांचा अहवाल आहे. या उत्पादन वाढीसाठी सॅटेलाइट सपोर्ट, मोईश्चर सेंसर, वेदर स्टेशन चा वापर केल्यास ऊस उत्पादनामध्ये वाढ तर होतेच. तसेच; वीजवापर, पाणी, खते, कीटकनाशके इत्यादी खर्चामध्ये ३० टक्केपर्यंत बचत होत असल्याचे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.

Leave a Reply