24/10/2025

महसूलमंत्र्यांकडून कोल्हापूर जिल्ह्याच्या महसुली कामकाजाचे कौतुक

महसूलमंत्र्यांकडून कोल्हापूर जिल्ह्याच्या महसुली कामकाजाचे कौतुक

— नागरिकांचे प्रश्न गावातच सोडवण्यावर भर देण्याचे आवाहन

— जिल्हाधिकाऱ्यांच्या उपक्रमांना दाद

— नव्या योजनांसाठी सूचना

मुंबई/ प्रतिनिधी

: नागरिकांच्या समस्या गावातच सोडवण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील महसुली कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कामाचे कौतुक केले आणि नव्या उपक्रमांसाठी सूचनाही दिल्या.

या बैठकीला कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार आणि जमाबंदी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. महसूलमंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गावात जाऊन लोकांशी संवाद साधावा आणि त्यांच्या अडचणी गावातच सोडवण्याचा प्रयत्न करावा.

कोल्हापूर जिल्ह्याचा महसुली कामकाजाचा आढावा:
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महसुली कामांचा विस्तृत आढावा सादर केला. त्यांनी नमूद केले की, येत्या १ ते ७ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच, ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत ८२ मंडळांमध्ये ८४ शिबिरे यशस्वीपणे पार पडली आहेत. यामध्ये ६० हजार ५४८ दाखले वितरीत करण्यात आले आहेत.
‘पाणंद रस्त्यांसाठी अभियान’ अंतर्गत ८२८ रस्ते शोधण्यात आले असून, त्यापैकी ६२० रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. या रस्त्यांवर वृक्षारोपणाचे नियोजनही करण्यात आले आहे. प्रलंबित खटल्यांबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, एकूण ७५२० प्रकरणांपैकी ५७५२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित सर्व प्रकरणे पुढील तीन महिन्यांत निकाली काढण्याचे नियोजन आहे.
महसूल विभागाच्या दप्तरांच्या तपासणीवरही भर देण्यात येत आहे. ६६ हजार ४४० नोंदी तपासण्यात आल्या असून, त्यापैकी ३१ हजार चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यात आल्या आहेत. वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये ५०७ प्रकरणे वर्ग करण्यात आली आहेत, ज्यातून ४४ कोटी ७६ लाखांचा निधी मिळाला आहे आणि यावर्षी २ कोटी ३४ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.

नवीन उपक्रम आणि सूचना :

संजय गांधी निराधार योजना: १४९७ संजय गांधी निराधार योजनेच्या नोंदी प्रलंबित असून, तहसीलदारांनी घरोघरी जाऊन लाभार्थ्यांच्या याद्या पूर्ण कराव्यात. क्यूआर कोड तयार करून या याद्या गावागावातील व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
मंत्रालयातून आलेली प्रकरणे: मंत्री कार्यालयातून आलेल्या कागदपत्रांवर तातडीने निर्णय घेऊन लाभार्थ्यांना माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले.
— अतिक्रमणे: गायरान जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या असून, शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमित करण्याच्या सूचना आहेत. यासाठी १५० दिवसांचे सादरीकरण करण्यात आले आहे.
गौण खनिज वाटप: ५०८ लाभार्थ्यांना गौण खनिजांचे वाटप करण्यात आले आहे. २६ वाळू घाट निश्चित करण्यात आले असले तरी, पाण्याखाली घाट गेल्याने लिलावात अडचणी येत आहेत.
नदीतील गाळ काढणे: पंचगंगा नदीपात्रातील ६१ किलोमीटरपर्यंतचा गाळ काढण्याचे नियोजन आहे.
महसुली सेवा: शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन महसुली सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. व्हॉट्सॲप चॅटबॉक्स आणि सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सिटी सर्व्हे आणि प्रॉपर्टी कार्ड: ४ हजार प्रकरणे प्रलंबित असून, त्यापैकी १ हजार निकाली काढण्यात आली आहेत. ७०० घरांचा सिटी सर्व्हे सुरू असून, प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे काम शिबिर घेऊन केले जात आहे.
सर्वांसाठी घरे: कोल्हापूर जिल्ह्यात ‘सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एकही ग्रामपंचायत घराविना राहू नये, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. २०११ पूर्वी झालेल्या अतिक्रमणाबाबत, ५०० फुटांपर्यंतच्या जागेसाठी मोफत आणि त्याहून अधिक जागेसाठी ५० टक्के रक्कम आकारून जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश तहसीलदार आणि तलाठ्यांना देण्यात आले.
वाळू घाट: १ ऑक्टोबरला सर्व वाळू घाट कार्यान्वित केले जातील. वाळू घाटांची क्षमता तपासून योग्य प्रकारे लिलाव काढला जावा, जेणेकरून चोरीला आळा बसेल, असेही मंत्र्यांनी सांगितले.
सोशल मीडियाचा वापर: सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून शासनाचे लोकाभिमुख कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.
पाणंद रस्त्यांवर वृक्षारोपण: सर्व पाणंद रस्ते मोकळे करून दोन्ही बाजूंनी झाडे लावण्याची गरज असल्याचे सांगून, अमरावती पॅटर्न कोल्हापूरमध्ये राबवण्याची सूचना केली.
महसूलमंत्र्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल अभिनंदन केले आणि आगामी काळात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महसूल दिनाचे आयोजन करण्याची सूचनाही केली. हे सर्व प्रयत्न राज्याला महसुली कामकाजात पुढे नेण्यासाठी महत्त्वाचे ठरतील, असे त्यांनी अधोरेखित केले.

Leave a Reply