28/10/2025

आमदार सतेज पाटील आणि माझी मैत्री कायम राहणार – मैत्री दिनी मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

– मी दिलेला सल्ला आमदार सतेज पाटील आत्मसात करतील

– वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची अपेक्षा

– त्यांनी राजकारणात संयमाने आणि धीरोदत्तपणे प्रसंगाना तोंड दिले पाहिजे

– २५ ऑगस्ट रोजी राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश

कोल्हापूर/ प्रतिनिधी
माझी आणि आमदार सतेज पाटील यांची मैत्री आहे, ती कायम राहणार आहे. वैयक्तिक मैत्री, पक्षीय राजकारण आणि तात्विक राजकारण हे वेगवेगळे विषय आहेत. आज मैत्रीदिना दिवशी मी दिलेला सल्ला आमदार सतेज पाटील आत्मसात करतील, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. त्यांनी संयमाने घ्यावे, राजकारणात असे प्रसंग येतात. अशा प्रसंगांना धीरोदात्तपणे तोंड द्यावे, असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, दिवंगत आमदार पी. एन पाटील यांचे दोन्हीही सुपुत्र राहुल पाटील आणि राजेश पाटील तसेच; त्यांचा सर्व गट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. कोल्हापुरात उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत साधारणता २५ ऑगस्ट रोजी हा प्रवेश होईल, अशी अपेक्षा आहे. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमांमध्ये मी आमदार सतेज पाटील यांना सल्ला दिला होता की, त्यांनी एवढं हळवं होण्याची गरज नाही.

आमदार दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचा सर्व गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यामुळे राधानगरीतील काही कार्यकर्ते ते फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. वास्तविक; आपणाला माहित आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष म्हणून आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यात फार मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. कारण; एकवेळी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार आणि दोन खासदार होते. आता मी राष्ट्रवादीचा जिल्ह्यात फक्त एकटाच आमदार आहे. त्यामुळे, अनेक मंडळी सोडून गेली. परंतु; असा आक्रस्ताळेपणा आम्ही कधीही केलेला नाही. असेल त्या परिस्थितीला संयम आणि विनयाने धीरोदात्तपणे सामोरे जात आहोत. त्यामुळे सतेज पाटील यांनी असं करण्याची आवश्यकता नाही. त्यानी राधानगरीमध्ये तसे वक्तव्य केलं ते केलं. परंतु; करवीरमध्येही जाऊन ‘सत्तेसाठी ते जात आहेत’ असं वक्तव्य केले आहे. वास्तविक; मतभेद जरूर असावेत. परंतु; मनभेद नसावेत. कै. पी. एन. पाटील गट काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये का जात आहे याचं संशोधन करायचं झालं तर त्याला वेगळे वळण लागेल. म्हणून आमदार सतेज पाटील यांनी संयमानं घ्यावं. आपल्यावर राजकारणामध्ये असे प्रसंग येत असतात, त्याला धीरोदात्तपणे संयमाने तोंड दिले पाहिजे.

हे माझे दुर्दैव…..!

मंत्री म्हणाले, वास्तविक आज बाणगे ता. कागल येथे पायी वारीला गेलेल्या विणेकरी व तुळशीवाल्या माऊलींचा पूजन सोहळा माझ्या हस्ते झाला. एवढ्या आनंदाच्या आणि पवित्र दिवशी आमदार सतेज पाटील यांच्याबाबत अशी प्रतिक्रिया द्यावी लागणं, हे माझं दुर्दैव म्हणावं लागेल. आमदार पाटील आजपासून माझे मार्गदर्शन ऐकतील, असा आशावादही मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

Leave a Reply