राहुल पाटील हातावर बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ
राहुल पाटील हातावर बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ – करवीर मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आजमावली मते
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेशाबाबत बहुसंख्य कार्यकर्त्यांचा ग्रीन सिग्नलस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील चित्र बदलणार
कृष्णात चौगले / कोल्हापूर :
राजकीय आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत ‘काँग्रेस ‘सोबत एकनिष्ठ राहिलेले दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार गट) वाटेवर आहेत. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लवकरच होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या जाहीर प्रवेश करणार असल्याची प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
भोगावती साखर कारखान्याच्या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आणि आगामी गोकुळ, जिल्हा बँकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या गटातील कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय त्यांच्याकडून घेतला जाईल अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. त्यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामागे अनेक राजकीय कंगोरे दडले आहेत. या प्रवेशासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची मते आजमावली असून बहुसंख्य कार्यकर्त्यांनी त्यांना ग्रीन सिग्नल दिला आहे.
काँग्रेससोबत निष्ठावंत असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्षांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर राहुल पाटील त्यांचे राजकीय वारसदार ठरले. काँग्रेसकडून करवीर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार चंद्रदीप नरके यांच्याविरोधात त्यांनी निकराची झुंज दिली. पण त्यांचा काठावरचा पराभव झाला. भोगावती शिक्षण मंडळ, भोगावती सहकारी साखर कारखाना, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा बँक, सूतगिरण यासह अनेक सहकारी संस्थांमध्ये पाटील गटाचा दबदबा आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या भोगावती साखर कारखान्यासह अन्य संस्था जिवंत ठेवण्यासाठी राहुल पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची विधानसभा निवडणुकीनंतर सुरुवातीच्या काही दिवसात चर्चा होती. पण गेल्या काही दिवसांत त्यांच्याकडून भाजपऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद मतदार संघ निहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मते अजमावली आहेत. यामध्ये काही किरकोळ अपवाद वगळता बहुसंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी राहुल पाटील यांना सकारात्मकता दर्शवली आहे
उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट आणि साक्षीला मंत्री हसन मुश्रीफ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी पवार यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन राहुल पाटील यांनी चर्चा केली आहे . त्यामध्ये पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास योग्य मानसन्मान ठेवला जाईल अशी ग्वाही दिली असल्याचे समजते. या बैठकीतील सर्व चर्चेचे मंत्री हसन मुश्रीफ हे साक्षीदार असल्याचे राहुल पाटील यांनी करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीरपणे सांगितले.
लवकरच साधला जाणार राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त
पाटील गटाकडे असणाऱ्या सहकारी संस्था आर्थिक उर्जितावस्थेत ठेवायच्या असतील, त्यांना सरकारचे बळ मिळवायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यास हरकत नसल्याचे बहुसंख्य कार्यकत्यांनी सांगितले. त्यामुळे राहुल यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय जवळपास पक्का झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गणेशोत्सवापूर्वी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये मुहूर्त साधला जाणार आहे.
जि.प.निवडणुकीत काँग्रेसला बसणार फटका
सद्या सर्वच राजकीय पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. जि.प. निवडणुकीचा विचार केल्यास करवीर तालुक्यात सर्वाधिक 12 जि.प.गट आहेत. गतनिवडणुकीत 11 पैकी बहुतांशी गटावर दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या गटाची सत्ता होती. त्यामुळे राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा करण्यासाठी आणखी बळ मिळणार आहे. परिणामी कॉंग्रेस पक्षाला त्याचा मोठा फटका बसणार आहे.
महायुतीच्या घटक पक्षांमध्येच होणार लढत
करवीर विधानसभा मतदारसंघात त राजकीय परिस्थिती पाहता पश्चिम पन्हाळ्यामध्ये आमदार चंद्रदीप नरके आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांच्या गटातच प्रमुख पारंपारिक लढत होते. तर मतदारसंघाच्या करवीर तालुक्यातील उर्वरित भागात आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध काँग्रेसचे दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या गटात निकराची झुंज आता पाहायला मिळायची. मात्र राहुल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर करवीर विधानसभा मतदार संघात महायुतीच्या घटक पक्षांमध्येच सामना रंगणार आहे. त्यामुळे महायुती म्हणून निवडणूक लढविण्याबाबत नेत्यांकडून केली जाणारी विधाने फोल ठरणार आहेत.
करवीर मतदारसंघात पाटील गटाचा दबदबा कायम
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मजबूत करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार, पदाधिकारी, आणि कार्यकर्त्यांवर महायुतीने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांना महायुतीत घेण्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. यातूनच करवीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी राहुल पाटील यांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेली अनेक वर्षे पाटील गट हा काँग्रेससोबत निष्ठावंत म्हणून ओळखला जातो. अनेकदा मंत्रिपदावेळीही दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांना डावलले गेल्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. तसेच पी एन पाटील यांच्या निधनानंतर एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राहुल गांधी यांनी पाटील कुटुंबियांच्या घरी जाऊन सांत्वन केले नसल्याची खंत कार्यकर्त्यांच्या मनात आहे. तरीही त्यांचा गट आजतागायत काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिला. राहुल पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत सुमारे दोन हजार मतांनी पराभव झाला असला तरी करवीर विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रबळ गट कायम आहे.