एसटी बस मध्ये मुलीची
छेडछाड – युवकास चोप.
चालकाने एसटी बस नेली थेट कळे पोलीस ठाण्यात
कळे /प्रतिनिधी
कोल्हापूर -बावेली मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमध्ये एका युवकाने शेजारी बसलेल्या तरुणीशी असभ्य वर्तन केले.
तरुणी रडू लागताच सदर युवकाने एसटी थांबवून पळ काढला. तरुणीच्या रडण्याचे कारण वाहकाने विचारताच घडलेला प्रकार तरुणीने सांगितला. तरुणीने आपल्या नातेवाईकांना फोन करून घडलेल्या घटनेची कल्पना दिली. त्यावेळी तत्काळ वाहकाने एसटी. थांबवून एका दुचाकी वरून पळालेल्या तरुणाचा पाठलाग केला व त्याला थोड्याच अंतरावरून पकडून परत एसटी. बसमध्ये आणले. एसटी. बसमधील इतर प्रवाशांनी त्या युवकास बसमध्येच बेदम चोप दिला.
दरम्यान त्याच वेळी मुलीचे अनेक नातेवाईक गाड्या घेऊन बसच्या मागोमाग आले व त्या छेड काढणाऱ्या तरुणांस ताब्यात द्या म्हणू लागले परंतु चालकाने प्रसंगावधान दाखवत, पालकांना समजावत एसटी. बस थेट पोलीस ठाण्याच्या दिशेने वळवली व कळे पोलिसांच्या ताब्यात त्या छेड काढणाऱ्या तरुणास दिले. कळे पोलिसांनी या युवकास चांगलाच चोप दिला. तथापि संबंधित तरुणीने लेखी तक्रार देण्यास नकार दिल्याने संबंधित युवकावर रीतसर गुन्हा दाखल होऊ शकला नाही.
“अशी घटना सार्वजनिक वाहनांत घडणे ही चिंतेची बाब आहे. मात्र चालक – वाहक व प्रवाशांनी दाखवलेली तत्परता ही खरंच कौतुकास्पद आहे,” असं प्रत्यक्षदर्शी प्रवासी महिलेने सांगितले