सारथी उपकेंद्रांतील विविध इमारतींचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मार्च मध्ये होणार लोकार्पण
सारथी उपकेंद्रांतील विविध इमारतींचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मार्च मध्ये होणार लोकार्पण
• – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
• सारथी उपकेंद्राच्या भव्य इमारतींच्या कामांची केली पाहणी
• इमारतीची कामे दर्जेदार व जलद गतीने करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
• सारथीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रचार प्रसिद्धीवर भर द्या
कोल्हापूर/प्रतिनिधी
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात कोल्हापूर मध्ये सारथी संस्थेचे पहिले उपकेंद्र उभारण्यात आले आहे. या उपकेंद्राच्या भव्य इमारतीचे लोकार्पण मार्च 2026 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असून हे काम जलदगतीने व दर्जेदार करा, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
कोल्हापूर मधील राजाराम महाविद्यालय परिसरामध्ये सारथी उपकेंद्राची इमारत उभारण्यात येत आहे. या परिसरात सारथी संस्थेची कार्यालयीन इमारत, संग्रहालय व अभ्यासिका, मुलांचे वसतीगृह मुलींचे वसतीगृह व भोजनगृह अशा इमारती उभारण्यात येत आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था- ‘सारथी’ च्या नवीन बांधकाम होत असलेल्या इमारतीची पाहणी पालकमंत्री श्री.आबिटकर यांनी केली. यावेळी सारथीच्या सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, उप अभियंता महेश कांजर, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत, हर्षल सुर्वे तसेच अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, कोल्हापूर मधील राजाराम महाविद्यालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या सारथी उपकेंद्राच्या नवीन इमारतींसाठी सुमारे 176 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. या उपकेंद्रात कार्यालयीन इमारत, शाहू महाराजांच्या स्मृती ग्रंथांसह समृद्ध ग्रंथालय असणार आहे. या उपकेंद्राच्या माध्यमातून मराठा समाजातील नव्या पिढीसाठी शिक्षणाची भक्कम पायाभरणी करण्यात येणार आहे. याबरोबरच मराठा समाजातील 500 मुलांसाठी व 500 मुलींसाठी भव्य वसतिगृहाची इमारत उभारण्यात येत आहे. मुला-मुलींसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, दर्जेदार शैक्षणिक सुविधा व वाचनालयही याठिकाणी तयार करण्यात येणार असून या उपकेंद्राचे मार्च 2026 पर्यंत लोकार्पण होणे अपेक्षित आहे.
या उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सारथी संस्था अधिक बळकट होणे आवश्यक आहे. सारथी’च्या वतीने राबवण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षण, शिष्यवृत्ती योजना, परदेश शिष्यवृत्ती योजना, विकासात्मक योजना तसेच स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आदी योजनांची व्यापक प्रसिद्धी करुन या समाजातील गरजू व गुणवंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून द्या. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यामध्ये या संस्थेच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढण्यासाठी तसेच सारथीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी तालुकास्तरावर शिबिरांचे, मेळाव्यांचे आयोजन करा, अशा सूचना पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी केल्या.
मराठा – कुणबी, कुणबी – मराठा या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कौशल्य विषयक प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, यासाठी विद्यावेतन त्याचबरोबर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती, राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना अशा योजना सारथी उपकेंद्रामार्फत राबविण्यात येतात. या सर्व योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सुमारे 86 कोटींचा निधी सन 2024- 25 मध्ये खर्च करण्यात आला असल्याची माहिती सारथी संस्थेच्या सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी या परिसरात सुरु असलेल्या विविध इमारतींच्या कामाच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणातून दिली. तसेच या सर्व इमारतींचे काम मार्च 2026 अखेर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.