26/07/2025

सावर्डे तर्फ असंडोलीतील अनुसूचित जाती प्रवर्ग 30 वर्षांपासून सरपंच पद आरक्षणापासून वंचित

सावर्डे तर्फ असंडोलीतील अनुसूचित जाती प्रवर्ग 30 वर्षांपासून सरपंच पद आरक्षणापासून वंचित

— अनुसूचित जाती प्रवर्गातील जनतेत असंतोष

— आरक्षणाचा फेरविचार करण्याची मागणी )

कळे/ प्रतिनिधी

सावर्डे तर्फे असंडोली (ता. पन्हाळा) – ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी १९९५ पासून आजवर झालेल्या आरक्षण प्रक्रियेमध्ये गेल्या 30 वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गाला एकदाही प्रतिनिधित्वाची संधी न दिल्यामुळे या प्रवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नुकत्याच २१ जुलै रोजी पार पडलेल्या आरक्षण सोडतीमध्ये पुन्हा एकदा सर्वसाधारण महिला या प्रवर्गालाच संधी दिली गेल्यामुळे असंतोषाचा सूर अधिक तीव्र झाला आहे.

सन २०१७-१८ ते २०२१-२२ या कालावधीत सर्वसाधारण महिला या प्रवर्गाला सरपंच पदाचे आरक्षण होते. त्याच प्रवर्गाला पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याने संविधानाने दिलेल्या समान संधी आणि प्रतिनिधित्व या तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील टप्प्यांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण अशा प्रवर्गांना संधी मिळाली, मात्र अनुसूचित जाती प्रवर्ग कायमच वंचित राहिला.

या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती समाजातून प्रश्न उपस्थित केला जात आहे की, “स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व करण्याचा अधिकार संविधानाने दिला असतानाही, प्रशासन कोणत्या निकषांवर आरक्षण निश्चित करत आहे?” अनुसूचित जातीचे प्रतिनिधी आज शिक्षण, व्यवसाय, प्रशासन, राजकारण अशा विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असून, नेतृत्वगुण दाखवत आहेत. मात्र ग्रामपंचायत पातळीवर ही संधी वारंवार नाकारली जात असल्याने असमाधान वाढत आहे. आरक्षणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता व समता ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

प्रशासनाने अरक्षणतील निकष स्पष्ट करावेत

“आरक्षणाच्या कोणत्याच टप्प्यात या गावातील सरपंच पदाच्या आरक्षणात अनुसूचित जाती प्रवर्गाला स्थान मिळालेले नाही. प्रशासनाने आरक्षण निश्चित करताना कोणता निकष लावला हे स्पष्ट व्हावे.”
राकेश काळे, सामाजिक कार्यकर्ते

————————————————————-

अनुसूचित जाती प्रवर्गाला प्रतिनिधित्वाची संधी द्यावी

“गेल्या अनेक वर्षांपासून अनुसूचित जाती प्रवर्ग सरपंचपदाच्या आरक्षणात वंचित राहत आहे. सद्य आरक्षण सोडतीचा पुन्हा विचार करून अनुसूचित जाती प्रवर्गाला प्रतिनिधित्वाची संधी द्यावी.”
अमित काळे, अध्यक्ष, छत्रपती शाहू प्रतिष्ठान, सावर्डे तर्फे असंडोली


एकदाही संधी न मिळालेल्या १६ गावांना अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण

१९९५ पासून पन्हाळा तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी गावच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्वाची संधी दिली जात आहे. शासन निकषानुसार तालुक्यातील १६ गावातील सरपंच पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित करणे आवश्यक होते. यावेळी अद्याप एकदाही संधी न मिळालेल्या १६ गावांना अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. अजून एकदाही संधी न मिळालेली गावे पन्हाळा तालुक्यात शिल्लक आहेत. त्यांना पुढच्या टप्प्यात आरक्षण मिळेल.

माधवी जाधव -शिंदे, तहसीलदार पन्हाळा.

 

Leave a Reply