शक्तीपीठ महामार्गामुळे करवीर पन्हाळा , राधानगरी तालुक्यास महापुराचा धोका
शक्तीपीठ महामार्गामुळे करवीर पन्हाळा , राधानगरी तालुक्यास महापुराचा धोका
बालिंगे / प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी असलेला शक्तीपीठ महामार्गाची एक शाखा कणेरी मठावरून जोतिबाकडे जाणार आहे. या मार्गामुळे राधानगरी ,करवीर व पन्हाळा तालुक्यातील गावांना पुराचा मोठा फटका बसणार असून हजारो एकर शेती उध्वस्त होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघचनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी बालिंगे येथील शक्तीपीठ महामार्गाच्या संभाव्य ठिकाणाहून दिली.
आज राजू शेट्टी यांनी नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गातून दख्खनचा राजा जोतिबाकडे जाण्यासाठी राज्य सरकारने कणेरी ते जोतिबा हा नवीन मार्ग निर्माण केला जाणार आहे या मार्गाच्या पूर परिस्थिती व होणारे नुकसानीची पाहणी करण्यासाठी बालिंगे व दोनवडे याठिकाणी आले होते. या मार्गावर कणेरी नंदवाळ , बालिंगे , साबळेवाडी , शिंदेवाडी , नितवडे ते केर्ली वरून जोतिबा पर्यंत हा मार्ग केला जाणार आहे. कणेरी ते जोतिबा हा जवळपास २८ किलोमीटरचा भाग असून यामधील ७ किलोमीटरहून अधिक जमीनीवर जवळपास २० ते ४० फुटाचा भराव होणार आहे.
राधानगरी , करवीर व पन्हाळा तालुक्यातील भोगावती , कासारी तसेच पंचगंगा या नद्यांवरून हा शक्तीपीठ महामार्ग करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरापासून ते भोगावती कारखाना , कुंभी कारखाना तसेच पन्हाळा तालुक्यातील शेकडो गावांना या भरावाच्या पुराचा फटका बसणार आहे. पावसाळ्यात महिना -महिना पाणी शिवारात राहिल्याने भविष्यात परिसरातील जमीनी क्षारपड होणार आहेत यामुळे शेतक-यांचे अपरिमीत नुकसान होणार आहे.
वरील तीनही तालुक्यातील गावामध्ये अल्पभुधारक शेतकरी असून गोरगरीब लोकांना महापुरात महिना -महिना गाव सोडून स्थलांतरीत होणे अडचणीचे होणार आहे. यामुळे करवीर पन्हाळा व राधानगरी तालुक्यातील शेतक-यांनी या महामार्गास कडाडून विरोध केला आहे.यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार , करवीर तालुकाध्यक्ष बाजीराव पाटील दोनवडेकर , बाजीराव पाटील कुडीत्रेकर , नितेश कोगनोळे, कुंडलिक पाटील , शिवाजी साळुंखे , यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.