शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे होणार कायम
– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय
-५०० चौरस फुटातील अतिक्रमणे होणार कायम
– २०११ पूर्वीच्या अतिक्रमण धारकांना मिळणार लाभ
कृष्णात चौगले/ कोल्हापूर
शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन राहत असलेल्या ३१ डिसेंबर २०११ पूर्वीच्या नागरिकांना त्यांच्या घराचा पट्टा वाटप करण्यात येणार आहे. सरकारी जमिनीवरील ५०० चौरस फुटापर्यंतची निवासी अतिक्रमाने नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातही वाढवणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. तसेच शेतरस्त्याचे वाद मिटवून येत्या पाच वर्षात प्रत्येक शेताला १२ फुटांचा रस्ता उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
येत्या 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत आयोजित होणाऱ्या महसूल सप्ताहाबाबत मंत्री बावनकुळे यांनी माहिती दिली. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांसाठी 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर लागत होता, आता याची आवश्यकता राहणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यांसह लाभार्थ्यांना महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तसेच उत्कृष्ट निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा 1 ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात येणार आहे.
2 ऑगस्ट रोजी वाटप केला जाणार घराचा पट्टा
2 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन राहत असलेल्या 31 डिसेंबर 2011 पूर्वीच्या नागरिकांना त्यांच्या घराचा पट्टा वाटप करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत सुमारे 30 लाख नागरिकांना याचा लाभ मिळेल.
पाणंद रस्त्याचे वाद 3 ऑगस्टला मिटणार
शेतासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या पांदण , शिवपांदण रस्त्यांचे वाद वर्षानुवर्षे सुरू राहतात. हे वाद मिटविण्यासाठी आदर्श कार्यप्रणाली निश्चित करण्यात येत आहे. यानुसार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्यास्तरावर दोन अपिल होऊन 3 ऑगस्ट रोजी अंतिम निर्णय होईल. त्यानंतर शेताच्या बांधावर 12 फुटांचा रस्ता तयार करुन त्यांना क्रमांक दिले जातील. या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लागवड केली जाईल. ही झाडे तोडल्यास वन विभागाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल होईल, असे मंत्री श्री.बावनकुळे यांनी सांगितले. येत्या पाच वर्षात रस्ता नाही असे एकही शेत शिल्लक राहणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांचा होणार निपटारा
महसूल विभागांतर्गत विविध प्रकारची अनेक प्रकरणे सुनावणीअभावी प्रलंबित आहेत. ही सर्व प्रकरणे मार्गी लावण्यासाठी 4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत महसुली मंडळात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात तहसीलदारांच्या पातळीवरील सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण करण्यात येतील. महसुली मंडळात वर्षातून चार वेळा या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री.बावनकुळे यांनी दिली. महसुली योजनांच्या ज्या लाभार्थ्यांना डिबीटीद्वारे लाभ मिळण्यामध्ये अडचणी आहेत, त्या अडचणी 5 ऑगस्ट रोजी तलाठी प्रत्येकाच्या घरी जाऊन सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
——————————
असा होणार महसूल सप्ताह
१ ऑगस्ट : उत्कृष्ट महसूल कर्मचारी-अधिकाऱ्यांना सन्मानित करणार
२ ऑगस्ट : शासकीय जागेवर रहिवासी प्रयोजनासाठी २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमित करून जागांचे पट्टे वाटप
३ ऑगस्ट : शेत व पाणंद रस्त्यांची मोजणी करून दुतर्फा झाडे लावण्यात येतील.
४ ऑगस्ट : मंडलनिहाय योजनांचा लाभ देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविणार
५ ऑगस्ट : विशेष सहाय योजनेतील लाभार्थ्यांना डीबीडी प्रणालीशी जोडण्यासाठी घरभेटी
