कोल्हापुरात शेंडा पार्क येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून गंभीर आजारांवर मिळणार मोफत उपचार – मंत्री हसन मुश्रीफ
–– राजर्षी शाहू आरोग्य संकुलाच्या पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शुभारंभ
कोल्हापूर/ प्रतिनिधी
शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज आरोग्य संकुलाच्या पहिल्या मजल्याच्या स्लॅबचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेंदू, हृदय, मनका, फुफ्फुस, किडनीसारख्या गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळणार असून, रुग्णांना यापुढे पुणे किंवा मुंबईला धाव घ्यावी लागणार नाही.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, विधानसभेपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या संकुलाचे भूमिपूजन झाले. आता प्रत्यक्ष बांधकामही वेगाने सुरू आहे. कोल्हापुरात इतकं मोठं आणि सुविधा-संपन्न हॉस्पिटल होत असल्याचा मला अभिमान आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, या संकुलामुळे केवळ कोल्हापूर जिल्ह्यालाच नव्हे, तर परिसरातील पाच-सहा जिल्ह्यांतील सामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. दिवंगत आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी सुरू केलेल्या या प्रकल्पाला मंत्री मुश्रीफ यांनी नवसंजीवनी दिली आहे. कोल्हापूर लवकरच एक वैद्यकीय हब म्हणून ओळखला जाईल.
आरोग्य संकुलाची वैशिष्ट्ये व विकासकामे
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण ५३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यामध्ये विविध आधुनिक रुग्णालयांची उभारणी करण्यात येणार आहे :
• ७ मजल्यांचे जनरल हॉस्पिटल (६०० खाटांचे)
• ६ मजल्यांचे कॅन्सर हॉस्पिटल (२५० खाटांचे)
• ६ मजल्यांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (२५० खाटांचे)
• किचन, लॉन्ड्री, स्टाफ वसतिगृहे, परिचारिका प्रशिक्षण केंद्र आदी सुविधांचा समावेश.
एकूण १ लाख १ हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रफळावर उभारणी होणाऱ्या या आरोग्य संकुलात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत ८४ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत.
कामांचा तपशील
• अंतर्गत रस्ते, गटार व फुटपाथ – १४.६८ कोटी
• जमीन समपात व सुशोभीकरण – १४.६० कोटी
• क्रीडा सुविधा (बॅडमिंटन, टेबल टेनिस कोर्ट) – ४.५६ कोटी
• फॉरेन्सिक इमारत – १४.७४ कोटी
• डॉक्टर्स व परिचारिका वसतिगृहे – प्रत्येकी १.३६ कोटी
• फर्निचर – १४.९६ कोटी
• वसतिगृह विद्युत व स्थापत्य कामे – १४.९९ कोटी
• मुलींचे १५० क्षमतेचे वसतिगृह – १.३६ कोटी
• २० कोटींचे ऑडिटोरियम हॉल पूर्ण, आता त्याचे फर्निचर, एकोस्टिक, विद्युतीकरण ₹ ९.५९ कोटींचे प्रगतिपथावर
• १६.९५ कोटींचे १५० मुलींसाठीचे वसतिगृह पूर्ण
• ७.४४ कोटींचे शवगृह उन्नतीकरण पूर्ण
• ९.५५ कोटींची व्याख्यान व परीक्षा कक्ष इमारत पूर्ण
• १० कोटींचे ग्रंथालय, प्रशासकीय, मायक्रोबायोलॉजी व पॅथॉलॉजी इमारती पूर्ण
या शुभारंभ सोहळ्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरजकुमार, आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
⸻