करवीरमध्ये पाडळी खुर्द, कागलमध्ये बानगे नवीन जि.प.गट
– जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर
– जिल्ह्यात एकूण ६८ जि.प.गट, १३६ पं. स.गण
— मिनी मंत्रालयावर करवीरचा वरचष्मा कायम
– आता इच्छूकांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे
कृष्णात चौगले/ कोल्हापूर
अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निश्चीत झाल्या असून सोमवारी जिल्हा परिषदचे ६८ गट आणि पंचायत समितीचे १३६ गणाचे प्रारूप मतदारसंघ जाहीर झाले. नव्या प्रारूप आराखाड्यामध्ये करवीर तालुक्यात पाडळी खुर्द आणि कागल तालुक्यात बानगे असे दोन गट वाढले आहेत.
जिल्हा परिषदेच्या मतदारसंघासाठी (गट) आणि पंचायत समितीच्या मतदारसंघासाठी (गण) जिल्ह्याच्या २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या विचारातृघेण्यात आली आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३,८७६,००१ आहे, ज्यापैकी १२,३०,००९ शहरी आणि २६,४५,९९२ ग्रामीण भागात राहतात या माहितीवरून प्रारूप आराखाडा जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये १२ तालुके, १२ पंचायत समित्या, १ महानगरपालिका, १० नगरपालिका आणि १,०२९ ग्रामपंचायती आहेत. या सर्व माहितीच्या आधारे सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६७ वरून पुन्हा ६८ तर पंचायत समितीची सदस्य संख्या १३४ वरून १३६ इतकी झाली आहे. हे मतदारसंघ निश्चित करण्यासाठी काही दिवसांपासून प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार मतदारसंघाची प्रारूप रचना निश्चित करण्यात आली आहे. यावर आता २१ जुुलै पर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. मात्र हरकती काही आल्या तरी या प्रारूप रचनेमध्ये फारसा बदल घडून येणार नाही हे जवळ जवळ निश्चीत आहे.
भौगोलिक रचनेचा तसेच नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतींचा विचार करता कागल आणि करवीर तालुक्यात दोन्ही मतदारसंघाची संख्या प्रत्येकी एक गट आणि दोन गणाने वाढली आहे. यापूर्वी कागल तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच तर पंचायत समितीचे दहा मतदारसंघ होते, आता जिल्हा परिषदेसाठी सहा तर पंचायत समितीसाठी १२ मतदारसंघ तथा गट झाले आहेत. करवीर तालुक्यात जिल्हा परिषदेचे ११ तर पंचायत समितीचे २२ मतदार संघ तथा गण होते, ते आता नव्या रचनेत जिल्हा परिषदेचे १२ तर पंचायत समितीचे २४ मतदारसंघ झाले आहेत. आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन आणि पंचायत समितीचे सहा मतदारसंघ होते. नव्या रचनेत आजऱ्यातील एक मतदारसंघ कमी झाला असून तिथे जिल्हा परिषदेचे आता दोन मतदारसंघ होतील, तर पंचायत समितीचे चार मतदारसंघ असतील.
——————————-
सहा तालुक्यांतील मतदारसंघात बदल
करवीर आणि कागल तालुक्यात मतदारसंघात प्रत्येकी एकाची वाढ झाली आहे. यामुळे या तालुक्यातील मतदारसंघाच्या यापूर्वीच्या रचनेत बदल झाला असून या तालुक्यांना आत विशेष महत्व आले आहे. गट आणि गण वाढल्याने कार्यकर्त्यांना अधिकची संधी देता येणे नेतेमंडळीना शक्य झाले आहे. जिल्ह्यात २०१७ नंतर हुपरी आणि शिरोळ या दोन नगरपालिका तर आजरा, चंदगड आणि हातकणंगले या नगरपंचायती नव्याने अस्तित्वात आल्या. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातून ही शहरे वगळण्यात आली आहेत त्याचा परिणाम नवी गावे या मतदारसंघात समाविष्ठ झाली आहेत. यामध्ये कोणती गावे आपल्यातून अन्यत्र गेली आहेत याची सोमवारी दिवसभर इच्छूकांकडून विचारणा केली जात होती.
——————————
हरकतींना सुरवात
प्रारूप मतदारसंघांवर सोमवार १४ जुलैपासून हरकत दाखल करता येणार आहे. या हरकती अथवा सूचना जिल्हाधिर्कायांकडे सादर कराव्या लागणार आहेत. २१ जुलैपर्यंत या हरकती सादर करता येणार आहेत. हरकत दाखल करण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी वगळून सहा दिवसांचा कालावधी मिळणार आहे. दरम्यान हरकतींची विभागीय आयुक्ताकं डे याची सुनावणी होईल त्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे येईल आणि १८ ऑगस्टला जिल्हाधिकारी हा प्रारूप रचना प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाईल.
—————————–
कागल तालुक्यात बानगे हा नवीन सहावा गट
कागल तालुक्यातील वाढलेल्या सहाव्या बानगे या जिल्हा परिषद गटात आनूर, पिंपळगाव बुद्रुक, मळगे खुर्द, माळगे बुद्रुक, भडगाव, चौंडाळ, चिमगाव, अवचित वाडी, शिंदेवाडी, कुरणी, सुरूपली, कुरुकली, सोनगे या गावांचा समावेश आहे
करवीरमध्ये पाडळी खुर्द हा नवीन गट
करवीर तालुक्यात एक जिल्हा परिषद मतदार गटाची वाढ होऊन 12 गट तयार झाले आहेत.यामध्ये पाडळी खुर्द हा नवीन जि.प गट तयार झाला आहे. या गटात सांगरूळ जिल्हा परिषद गटातील कोगे, बीड, शिरोली दुमाला आणि परिते जिल्हा परिषद गटातील वाशी,वाडीपीर ही गावे जोडण्यात आली आहेत. तसेच पाडळी खुर्द हे गाव शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून घेतले आहे. म्हणजेच तीन जिल्हा परिषद गटातील गावे एकत्र घेऊन पाडळी खुर्द हा जिल्हा परिषद गट तयार झाला आहे. या गावांसह शेळकेवाडी नांदगाव, महे, आरे , सावरवाडी शिरोली दुमाला , सडोली दुमाला, हिरवडे दुमाला या गावांचा समावेश आहे. तसेच सांगरूळ जिल्हा परिषद गटात चिंचवडे आणि भामटे या दोन गावांचा नव्याने समावेश झाला आहे.