बाजार समिती संचालक नंदकुमार वळंजु यांच्या विरोधातील अपीलावर सोमवारी सुनावणी
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती संचालक नंदकुमार वळंजु यांच्या विरोधातील अपीलावर सोमवारी सुनावणी
-विभागीय सहनिबंधक कार्यालयात दुपारी 3 वाजता होणार सुनावणी
– कैलास आहुजा यांच्या अपिलावर होणार युक्तिवाद
कृष्णात चौगले /कोल्हापूर
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक नंदकुमार वळंजु यांच्या संचालक पद अपात्रतेसाठी कैलास अहुजा यांनी तत्कालीन पणनमंत्र्यांकडे केलेल्या अपिलावर सोमवारी विभागीय सहनिबंधक डॉ.महेश कदम यांच्याकडे सुनावणी होणार आहे.
वळंजू यांच्या संचालक पद अपात्रतेसाठी अहुजा यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अपील दाखल केले होते .हे अपील 18 मे 2023 रोजी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी फेटाळले.या निर्णयाविरोधात अहुजा यांनी तत्कालीन पणनमंत्र्यांकडे अपील दाखल केले होते. पण महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक नियमानुसार राज्य शासनाला असलेले अधिकार विभागीय सहनिबंधकांना दिले आहेत. या अधिकारास अनुसरून वळंजू यांचे संचालक पद रद्द करण्याबाबत अहुजा यांनी केलेल्या अपिलावर सोमवारी दुपारी 3 वाजता विभागीय सहनिबंधक कार्यालयामध्ये सुनावणी होणार आहे.
वळंजु यांच्या विरोधातील अपीलकर्ता कैलास आहुजा यांनी 16 फेब्रुवारी 2024 रोजी तत्कालीन पणनमंत्र्यांकडे अपील सादर केले होते .या अपीलामध्ये त्यांनी जिल्हा उपनिबंधकांनी वळंजू यांच्याबाबत दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले आहे .सन 2023 ते 2018 या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये अडते व्यापारी मतदारसंघ प्रतिनिधी या गटातील वळंजू यांच्या उमेदवारी अर्जावर आहुजा यांनी आक्षेप घेतला होता. यामध्ये वळंजू यांनी बाजार समितीच्या सन 2015 ते 2020 या कालावधीत संचालक म्हणून कामकाज करताना कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले असून त्यांची उमेदवारी अर्ज रद्द करावा अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती.यावेळी अहुजा यांची मागणी फेटाळण्यात आली होती. या निर्णयावर आहुजा यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागितली होती.पण हे अपील देखील जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळले. या आदेशाविरोधात अहुजा यांनी तत्कालीन पणन मंत्रांकडे अपील केले होते. पण महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती नियमानुसार राज्य शासनाचे अधिकार विभागीय सहनिबंधकांना दिले आहेत. त्यामुळे अपीलकर्ता अहुजा यांचे अपील 21 मे 2025 रोजी शासनाने विभागीय सहनिबंधकांकडे पाठवले आहे. त्याबाबत सोमवारी सुनावणी होत आहे.
अपीलकर्ता अहुजा यांचे वळंजू यांच्या विरोधातील आक्षेप
2015 ते 2020 मध्ये वळंजू हे बाजार समिती संचालक पदावर असताना 29 व्यक्तींची नियमबाह्य नोकर भरती .त्यामध्ये त्यांच्या मुलग्याचा ही समावेश. सदर नोकर भरतीसाठी पणन संचालकांची पूर्व परवानगी घेतलेली नाही. बाजार समितीच्या लेखापरीक्षणाच्या अहवालामध्ये वळंजू यांनी केलेला प्रवास खर्च आणि मोघम खर्च रकमा येणे बाकी दर्शविलेले आहेत .बाजार समिती परिसरातील प्लॉट हस्तांतरणात कायद्याचा भंग आदी तक्रारींचा समावेश आहे.
दरम्यान संचालक पदाच्या कार्यकाळात वळंजू यांनी कोणतेही काम नियमबाह्य अथवा कायद्यातील तरतुदींचा भंग करून केले नसल्याचा युक्तिवाद यापूर्वी जिल्हा उपनिबंधकांकडे झालेल्या सुनावणीत त्यांच्या वकिलांनी केला होता.