27/07/2025

घरातील व शेतातील विजेची निष्काळजी बेततेय ग्राहकांच्या जीवावर

ग्राहकांच्या परिसरात १५ महिन्यात ७५ प्राणांतिक अपघात वीज अपघात टाळण्याकरता सावधता बाळगा – महावितरणचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी

विजेच्या उपकरणांवर काम करताना सुरक्षितता व साक्षरता बाळगणे गरजेचे आहे कारण वीज ही चुकीला माफी देत नाही. मात्र आजही अनेक ग्राहक वीज सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेत नसल्याने गेल्या १५ महिन्यांत(एप्रिल २४ ते जून २५) कोल्हापूर परिमंडलात ग्राहकांच्या आवारात/परिसरात (प्रिमायसेस) १२३ अपघात झाले आहेत. यामध्ये ७५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर ४८ ग्राहक जखमी झाले आहेत.अशा प्राणांतिक अपघातात संबंधित कुटुंबाची न भरून येणारी हानी होत असल्याने विजेबाबत ग्राहकांनी त्यांच्या घरात, परिसरात, शेतात काम करताना योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीज अपघात कमी होण्याकरता महावितरण हे नेहमीच प्रयत्नशील आहे. याकरता १ त ६ जून या कालावधीत राज्यभरात सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जाते. तसेच नियमितपणे वीज यंत्रणेची देखभाल दुरुस्तीची कामे व जनजागृतीही केली जातात. याचाच परिणाम म्हणून महावितरण यंत्रणेवरील अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र ग्राहक त्यांच्या घरात व शेतात काम करताना, बांधकाम करताना, घरातील व शेतातील पाण्याची मोटर हाताळताना, बांधकामावर पाणी मारताना, कडबाकुट्टीवर काम करताना तसेच इत्यादी कामे करताना वीज सुरक्षेची काळजी घेत नसल्याने गेल्या १५ महिन्यांत ७५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ७० (कोल्हापूर ४२, सांगली २८) जनावरे दगावली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात वीज उतरलेल्या जोडणी व उपकरणांमुळे २१, वीज चोरी व अनधिकृत जोडणीमुळे २, खराब उपकरणांमुळे ७ आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने १५ अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सांगली जिल्ह्यात वीज उतरलेल्या जोडणी व उपकरणांमुळे १६, वीज चोरी व अनधिकृत जोडणीमुळे ४, खराब उपकरणांमुळे ९ आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने १ अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. विजेबाबत सजगता राखून नागरिकांना हे अपघात पूर्णपणे टाळता येऊ शकतात.

विजेची कामे करताना नागरिकांनी सावधता बाळगावी – महावितरण

अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने विद्युत संच मांडणीत रेसिड्युयल करंट सर्किट ब्रेकर (RCCB) बसवणे आवश्यक आहे. यामुळे विजेच्या धक्क्यापासून बचाव होतो आणि वीजप्रवाह ताबडतोब बंद होतो.अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करावी. घरातील आणि दुकानातील स्विच बोर्ड आणि विद्युत उपकरणे पाण्याच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्या. विद्युत मांडणीतील वायरिंग ठिकठिकाणी जोडलेली नसावी आणि ती घराच्या/शेडच्या पत्र्यापासून किंवा लोखंडी अँगल पासून सुरक्षित असल्याचे तपासा. वीज यंत्रणेस जनावरांना बांधू नये.

कधीही ओल्या हातांनी विद्युत उपकरणे हाताळू नका. पायात रबरी चप्पल किंवा बूट घाला. घरातील वायरिंग वीज भारानुसार योग्य क्षमतेचे आणि गुणवत्तेचे असल्याची खात्री करा. विद्युत पुरवठा वारंवार चालू-बंद होत असल्यास किंवा कमी दाबाचा होत असल्यास विद्युत उपकरणे बंद करून ठेवा. ISI दर्जाची विद्युत उपकरणे वापरा. प्लग साँकेटमध्ये उघड्या वायर्स खोचणे टाळा. पॉवर पॉईंट्स लहान मुलांच्या हातास लागणार नाहीत अशा उंचीवर लावा. विजेवरील उपकरणे हाताळताना नेहमी विद्युत पुरवठा बंद करा.वीजपुरवठा खंडित झाल्यास, अनाधिकृत आणि अप्रशिक्षित व्यक्तींकडून महावितरण विद्युत यंत्रणेतील कोणतेही काम करून घेऊ नका, हे धोकादायक आणि जीवघेणे ठरू शकते.

Leave a Reply