शक्तीपीठ महामार्गाला एक टक्के शेतकऱ्यांचाही पाठिंबा नाही
शक्तीपीठ महामार्गाला एक टक्के शेतकऱ्यांचाही पाठिंबा नाही
– स्वाभिमानी शेतकरी संघटनेचने नेते राजू शेट्टी यांची माहिती
— १ हजार शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गास परवानगी देण्याचा मुख्यमंत्र्यांचा केवळ कांगावा
कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील १ हजार शेतक-यांनी शक्तीपीठ महामार्गास सम्मती दिली असल्याचा कांगावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामध्ये त्यांचा ढोंगीपणा समोर आला आहे. मुंबईत दोन दिवसापुर्वी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील ३५ शेतक-यांनीच सात बारा दिले असून १ टक्काही लोकांचे शक्तीपीठ महामार्गास समर्थन नसल्याचे दिसून आली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघचनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.
दोन दिवसापुर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबईत बैठकीत घेतली. या बैठकीत ३५ लोकांनी सात बारा शासनाकडे जमीन संपादनास दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकुण ३८२२ गटधारकांची जवळपास ५३०० एकर संपादित केली जाणार असून या गटामध्ये १० हजार हून अधिक शेतकरी समाविष्ट आहेत. यामुळे गटधारकांच्या १ टक्काही लोकांचे या महामार्गास सम्मती नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्य सरकार शक्तीपीठ समर्थनासाठी जो खटाटोप करत आहे त्यामध्ये ते अपयशी ठरले आहेत. ज्यापध्दतीने कोल्हापूरची करवीर निवासनी अंबाबाई देवीने कोल्हासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आता कोल्हापुर शहरातील जनतेला पुराच्या खाईत लोटणा-या शक्तीपीठ महामार्ग रूपी राक्षसापासून कोल्हापूरच्या जनतेचे रक्षण आई अंबाबाईच करेल.
कॅाग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गेल्या अधिवेशनात समर्थन करणा-या शेतक-यांची यादी मागितली. गत आठवड्यात याबाबत लेखी पत्र सुध्दा दिले मग ही माहिती त्यांना ती आज अखेर देण्यात आली नाही. जमीनीच्या मोबदल्यासंदर्भात राज्य सरकारचा कोणताही निर्णय स्पष्ट झालेला नाही. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री कोणतीही गोष्ट रेटून व लादून करण्याचा प्रयत्न करत आहेत.दोन दिवसापुर्वी झालेल्या बैठकीत माणगाव गावातील ६ लोक घेऊन गेले होते मात्र त्यातील ३ लोकांचीच जमीन संपादित केली जाणार आहे उर्वरीत तीन लोक भुजगावणे म्हणूनच घेऊन गेले होते.राजेश क्षीरसागर यांनी खोटी वैद्यकीय बिले दाखवून ८६ लाख रूपयाची शासनाची फसवणूक केली तेच राजेश क्षीरसागर आता शक्तीपीठ महामार्गात बोगस शेतकरी दाखवून ५० हजार कोटीत ढपल्यामध्ये हिस्सा घेण्यासाठी खटाटोप करत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गामुळे महापूर , सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व वन विभागातील इको सेन्सिटीव्ह झोन मध्ये होणारी पर्यावरणाची हाणी , क्षारपड जमीनीची समस्या , शहरी व ग्रामीण भागातील वाढीव पुरबाधित भागातील गोरगरीब लोकांचे होणारे नुकसान , महामार्गाच्या दोन्ही बाजूस संरक्षित भिंत असल्याने गावाचे -शेतीचे व वाडी वस्तीचे होणारे विभाजन , उस उत्पादनात घट झाल्याने भविष्यात साखर कारखानदारी व ऊस उत्पादक शेतक-यांचे होणारे नुकसान याबाबत मुख्यमंत्री कोणतेही वक्तव्य करण्यास तयार नसल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.