31/10/2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरनंतरच

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरनंतर

— राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची स्पष्टोक्ती

–नाशिक येथील पत्रकार बैठकीत माहिती

–निवडणुकांमध्ये वापरण्यात येणार नाही व्हीव्ही-पॅट मशिन 

कोल्हापूर/ प्रतिनिधी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक प्रक्रिया ऑक्टोबरनंतर सुरू होईल. म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारीमध्ये प्रत्यक्ष निवडणुका होतील अशी शक्यता निवडणूक विभागाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केली. वाघमारे यांची नाशिक येथे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडनुकांची प्रक्रिया ही दिवाळीनंतर सुरू होईल असे संकेत दिले.

वाघमारे म्हणाले, ‘ मनुष्यबळाअभावी निवडणुका एकत्रित घेता येणार नाहीत. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या टप्प्याटप्प्याने होतील. मात्र जिल्हा परिषद अथवा महानगरपालिकांपैकी कोणत्या निवडणुका पहिल्या टप्यात होतील हे अजून निश्चित केले नाही. १ जुलै २०२५ च्या मतदार यादीच्या आधारे निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांमध्ये व्हीव्ही-पॅट मशिन वापरण्यात येणार नाहीत.’

राज्यातील अनेक नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद व महापालिका सभागृहाची मुदत संपली आहे. सभागृहाची मुदत संपून साधारणपणे तीन ते पाच वर्षाचा कालावधी उलटला आहे. तब्बल ६८७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहे. यामुळे या निवडणुका केव्हा होणार ? हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या आदेशात २७ टक्के ओबीसी आरक्षणानुसार नव्या प्रभाग रचनेनुसार महापालिकांच्या निवडणुका घ्याव्यात असे म्हटले आहे. त्या आदेशानुसार निवडणूक विभागाने प्रशासकीय तयारी सुरू केली आहे. यामुळे दिवाळीनंतर निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.

Leave a Reply