मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी – गरजू रुग्णांसाठी विश्वासार्ह आधार
(विशेष लेख)
कोल्हापूर
भारतातील ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या माध्यमातून या आव्हानाला तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमांचा मुख्य उद्देश प्रत्येक गरजू व्यक्तीला आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, हे सुनिश्चित करणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व कक्ष प्रमुख रामेश्वरभाऊ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा राज्यात सर्वत्र सुरू करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात हा कक्ष १ मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन झाला असून, यामुळे स्थानिक स्तरावर गरजूंना त्वरित वैद्यकीय सहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कक्षामार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदत पुरवणे, धर्मादाय रुग्णालयांमधील सुविधांचा विस्तार करणे, सरकारी आणि खाजगी यंत्रणांमध्ये समन्वय साधणे, आरोग्य सेवांमध्ये समता आणणे, सामाजिक जबाबदारीअंतर्गत रुग्णालयांकडून सहाय्य मिळवणे, त्वरित निर्णयप्रक्रिया आणि पारदर्शक कार्यपद्धती यावर विशेष भर देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील या कक्षामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी देणगी धनादेशाद्वारेही स्वीकारली जाते. आत्तापर्यंत मागील दोन महिन्यात विविध संस्था दानशूर व्यक्तींकडून १ लाख ५६ हजार इतकी मदत या कक्षाला देण्यात आली आहे. यामुळे हा कक्ष गरजू रुग्णांसाठी एक विश्वासार्ह आधार बनला आहे. कक्ष स्थापन झाल्यापासून दोन महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ५७५ रूग्णांना ४ कोटी ४७ लाख ६५ हजार रूपयांची वैद्यकिय मदत केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील १९९ रुग्णालये या सेवेशी जोडली गेली आहेत, ज्यामुळे रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचार घेणे सोयीचे झाले आहे. गरजूंनी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षास संपर्क साधावा. या कक्षाची कार्यप्रणाली सुलभ आणि पारदर्शक ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे रुग्णांना तातडीने मदत मिळते. या उपक्रमांतर्गत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालयांमार्फत मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यासारख्या योजनांमधून उपचार होवू न शकणाऱ्या २० गंभीर आजारांसाठी २५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. या मदतीमुळे गंभीर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार मिळाला आहे.
हा उपक्रम सामाजिक समतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील गोरगरीब लोकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळणे, हे या योजनेचे यश आहे. यामुळे रुग्णांचे जीवनमान सुधारते आणि त्यांच्या कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी होतो. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमधील समन्वयामुळे वैद्यकीय सेवांचा दर्जा आणि उपलब्धता यात वाढ झाली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांनी गरजू रुग्णांसाठी नवीन आशा निर्माण केली आहे. प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याचा अधिकार प्रत्यक्षात आणण्यासाठी हा उपक्रम राज्यात एक यशस्वी पाऊल ठरत आहे.
सर्व पॅनलवरील रुग्णालये एकाच पोर्टलवर संलग्न करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पेपरलेस कामकाज येत्या काळात सुरू होणार आहे. यामुळे या प्रक्रियेत अधिकची पारदर्शकता व गतिमानता येणार आहे. मुख्यमंत्री कम्युनिटी हेल्थच्या माध्यमातून अधिकाधिक वंचित रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा हा कक्ष प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी टोल फ्री क्रमांक १८००१२३२२११ या क्रमांकावर आवश्यक मदतीसाठी संपर्क साधवा असे आवाहन कक्ष अध्यक्ष डॉ.चंद्रकांत परुळेकर यांनी केले आहे.